“ साहित्य सेतू ” मध्यवर्ती संकल्पना

साहित्य सेतू ही संकल्पना प्रा. क्षितिज पाटुकले यांची असून ते साहित्य सेतू या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेचे निमंत्रक प्रसिध्द लेखक श्री. रविंद्र गुर्जर हे आहेत.  संकल्पना थोडक्यात खालिलप्रमाणे

१) लेखक वाचक गुंफण - मराठी साहित्य, लेखक, वाचक, वाचन संस्कृती, प्रकाशक यांबाबत अनेकदा अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी चर्चा आणि लिखाण होत असते. यामध्ये साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक असा एक त्रिकोण तयार झालेला दिसतो. याच्याशी संलग्न अनेक इतर घटकही आहेत. उदा. विविध साहित्य परिषदा, संस्था, वाचक संस्था, वाचनालये, बुक क्लब्स, किरकोळ पुस्तक विक्रेते, मीडिया, सरकारी संस्था इ. मात्र या सर्वांमध्ये प्रत्यक्ष वाचक आणि साहित्यिक यांची एकत्र संवाद व्यवस्था नाही. थोड्याफार प्रमाणात काही साहित्यिक काही वाचक समूहांबरोबर संवाद साधताना दिसतात. परंतु त्याच्याही अनेक मर्यादा दिसतात, लेखक वाचकांपर्यत पोहचत नाही.

२) व्यावसायिक लेखक - बहुतांश साहित्यिक हे वेळ मिळेल तसा किंवा फावल्या वेळेत  म्हणून साहित्य लिहितात. त्यांचे पोटापाण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय असे स्वतंत्र साधन असते. आर्थिक स्थैर्यानंतर ते लिखाण करतात. मराठी साहित्यविश्वात पूर्णतः व्यावसायिक लेखक अपवादानेच आढळतील. कारण तसे होता येते हेच आपल्याकडे माहित नाही. तेव्हा व्यावसाय़िक लेखक होण्यासाठी लेखकांना मार्गदर्शनपर सेवा पुरविणे ही आजची मोठी गरज आहे.

३) लेखक आणि प्रकाशक नाते -- साहित्यिक आणि प्रकाशक हे नातेही अतिशय गुंतागुंतीचे दिसते. आपण लिहिलेले साहित्य प्रकाशित व्हावे अशी लेखकाला तीव्र ओढ असते, मात्र प्रकाशकाच्या दृष्टीने ती एक जोखीम असते. त्यामुळे त्यांच्यामधील  नाते जवळकीचे वाटत असले तरीही त्यात म्हणावा तसा मनमोकळेपणा दिसत नाही. सुरुवातीला प्रेमविवाहासारखे दिसणारे, तसे वाटणारे हे नाते नंतर मात्र तसे रहात नाही. फार थोड्या साहित्यिकांच्या वाट्याला प्रकाशकाचे प्रेम कायमस्वरूपी येते. हे अंतर कसे कमी करता येईल, साहित्यिक - वाचकांना पडणा-या प्रश्नांची उत्तरे कशी देता येतील व त्यासाठी सर्वांनाच सहाय्यभूत असे काही नवे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.

 

४) तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व अविष्कार -- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत, संपूर्ण जगात सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाने अमूलाग्र बदल घडविले आहेत. साहित्य निर्मिती आणि वितरण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तंत्रज्ञानाने साहित्यिक आणि वाचक यांना जवळ आणले आहे. पुस्तक लिहिणे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवणे यातील वितरण यंत्रणा सर्वांगाने बदलत चालल्या आहेत. साहित्यिक आणि वाचक यांना एकमेकांबरोबर मुक्त संवाद साधता येतो आहे. त्याचबरोबर फक्त लेखन झाले, की माझे काम संपले असे म्हणणाऱ्या लेखकाला तंत्रज्ञानामुळे स्वतःहून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा, सोशल मीडियाद्वारे स्वतःचा फॅनक्लब तयार करता येण्यासाठी अधिक वाव निर्माण झाला आहे. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, व्हॉटस् अप, गुगल प्लस,     ई - बुक, प्रिंट ऑन डिमांड, डिजिटल प्रिंटिंग, इ. अनेक आधुनिक तांत्रिक अविष्कारांमुळे साहित्य आणि पुस्तक निर्मिती हे क्षेत्र पूर्णतः ढवळून निघत आहे. भविष्यात प्रकाशन व्यवसाय आणि पुस्तक विक्री व्यवसायाचे चित्र संपूर्णतः बदलून ई - बुक आणि तंत्राधिष्ठित पुस्तकनिर्मिती आणि वितरण अशी व्यवस्था उदयाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

५) मराठी साहित्य संस्थांची उदासिनता -- मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचेविषयीदेखिल सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये नाराजी आहेत. मराठी साहित्य विश्वात कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, तेथे नक्की कोणते कार्य चालते, साहित्य संमेलनांचे आयोजन कोण करते, संमेलनाध्यक्षपदाची निवड कशी होते याबाबतीत बहुधा सार्वजनिक अज्ञान आहे. मराठी साहित्य विश्वातील संस्था, त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांची वक्तव्ये यांनी तीन चार महिने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून वाहतात. सर्वसामान्य माणसाची त्यातून करमणूक होते. पण त्याचे कुतूहल शमत नाही.  त्याला त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हायचे आहे. पण कसे व्हायचे ते कळत नाही. साहित्यविश्वातील कंपूशाही, झुंडशाही आणि आपण काहीही करू शकत नाही, ही हतबलता सर्व सामान्य मराठी माणसाला उद्विग्न करते.

 

६) पारंपारिक निष्क्रिय साहित्यजगतातील वातावरण - साहित्य क्षेत्रातील घडामोडी आणि एकंदरीत बाह्य चित्र हे अजूनही परंपरागत संस्था, साहित्यिक, नोकरशाही, वाचनालये, विक्रेते यांच्या जुनाट साचेबंद वर्तणुकीतच घुटमळताना दिसत आहे. जणू काही बाहेरच्या जगात काय चालले आहे याचा त्यांना थांगपत्ताही नाही, होणारे बदल त्यांना दिसतच नाहीत किंवा कोणत्याही बदलांची पर्वा करण्याची आपणास गरज नाही, अशा थाटात ते वावरत आहेत. खरं म्हणजे या सर्व घडामोडींत मरगळ झटकून मराठी साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणे अपेक्षित आहे. आज वाचकांची प्रगल्भता वाढत आहे. साहित्यविश्वाचा आवाका आणि क्षितिजे यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. तंत्रज्ञानाबद्दलची माहिती सर्वाना आहे. मात्र त्याचा वापर करून विस्ताराची शक्यता, उपयुक्तता आणि क्षमता यांचे अजूनही तितकेसे आकलन झालेले नाही.

       

७) साहित्य सेतू कुणासाठी ? -- महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून भारतातील इतर राज्यांत राहणा-या मराठी भाषिकांची संख्या २.५ कोटींच्या आसपास आहे. परदेशांमध्ये राहणारे एकूण मराठी भाषिक ५० लाखांपर्यंत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये साधारणपणे १५ कोटी मराठी बांधव आहेत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतामधील इतर राज्यांमध्ये जे मराठी बांधव आहेत, त्यांनाही मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी  रूची असते. इतकेच नव्हे, तर अगदी साता समुद्रापलीकडे ज्या मराठी बांधवांनी मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवला आहे; ते अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्त्रायल, आखाती देशांतील मराठी बांधवांनाही मराठी साहित्य जगतातील घडामोडींविषयी औत्स्युक्य असते. लेखक, कवी, वाचक, कलाकार, समीक्षक, अभ्यासक, वक्ते, प्राध्यापक, ग्रंथकार, प्रकाशक, श्रोते, गायक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी हौसे, नवशे आणि गवसे, समाजाच्या सर्व स्तरांतील संवेदनाशील बंधू भगिनी  साहित्य आणि संस्कृतीविषयक उपक्रमांच्या निमित्ताने  आपल्या कार्य कर्तृत्वाला कोणती संधी मिळते का याची चाचपणी करीत असतात. या १५ कोटी मराठी बंधू भगिनींसाठी माहितीचे आणि कौशल्यांचे आदान प्रदान करणे आणि त्यांना संधी आणि व्यासपीठ निर्माण करून देणे हा  साहित्य सेतूचा मुख्य उद्देश आहे. सक्षम साहित्यिक आणि  सजग वाचक ही काळाची गरज आहे. त्याअर्थाने ‘ साहित्य सेतू ’ ही  साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, वाचक, प्रकाशक आणि त्याअनुषंगाने संबधित सर्व घटकांना एकत्रित आणणारी एक अभिनव चळवळ आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच्या सेवा पुरविता येणे अशी सार्वजनिक क्षमता विकसित करणे,  हा या संकल्पनेमागचा प्रमुख हेतू आहे. मराठी साहित्य जगतामध्ये अमूलाग्र बदल घडवून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करोडो मराठी माणसांमध्ये एक साहित्यिक, सांस्कृतिक आणि भावनिक सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतविणे आणि त्यातून भावी पिढीसाठी एक अलौकिक वारसा निर्माण करणे, असे साहित्य सेतूचे क्रांतिकारी स्वप्न आहे. १५ कोटी मराठी बांधवांच्या सहाय्याने ते नक्की पूर्णत्वाला जाईल याची खात्री आहे.   

साहित्य सेतू संस्थेची स्थापना १ एप्रिल २०१५ रोजी झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये खालिल उपक्रम आयोजित केले आहेत.

१) लेखकांसाठी कार्यशाळा – ३० नोव्हेंबेर २०१५ रोजी लेखकांसाठी पहिली कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये ४७ बंधू भगिनींनी भाग घेतला होता.

२) साहित्य सेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या ( मसाप ) संकेतस्थळाची पुन:निर्मिती केली. तसेच मसापसाठी समाज माध्यमांची ( सोशल मीडियाची ) निर्मिती केली. मसापचा व्हॉटसअप समूह तयार केला. फेसबूक पेज तयार केले. ट्विटर खाते तयार केले. युट्युब चॅनेलची निर्मिती केली.

३) डोंबिवली येथे झालेल्या ९० व्या अ. भा. म. साहित्य संमेलनामध्ये प्रथमच साहित्य सेतूने संमेलनाला आलेल्या रसिकांची अभिप्राय पत्रे एकत्र करून त्यांचे विश्लेषण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला सादर केले आहे.       

४) डोंबिवली येथे झालेल्या ९०व्या अ.भा.म. साहित्य संमेलनामध्ये प्रथमच संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि अ.भा.म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांची भुमिकाआणि मुलाखती यु ट्युबद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या.

४) आजमितीला १० हजाराहून अधिक लेखक आणि २ लाखाहून अधिक वाचक साहित्य सेतूबरोबर जोडले गेले आहेत.

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black